महाराष्ट्रात पुन्हा भगवं वादळ? आंदोलनासाठी मनोज जरांगे यांची मोठी फिल्डिंग

Foto
जालना : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्लान केला आहे. मराठा आरक्षणासाठी गरजेच्या नोंदी रद्द करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. खरंतर सरकारकडून पूर्वनियोजित कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भ, मराठवाड्याचाही दौरा करेल, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाणार आहे. जरांगे यांचा १२ ऑगस्टपर्यंत दौरा असणार आहे. 

या दौर्‍याआधी मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलं. मनोज जरांगे म्हणाले, सत्ताधार्‍यांना सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेटीअर द्यायचं नाही. ५८ लाख नोंदी द्यायच्या नाहीत. त्यांना नोंदी रद्द करायच्या आहेत. सरकारने पूर्वनियोजित कट रचला आहे. मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय राहत नाही. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा रद्द करणार होता. परंतु पश्चिम महाष्ट्रातील लोकांनी पक्षाला मोठं केलं आहे.

आता त्यांच्या लेकरा-बाळांसाठी लढावं लागणार आहे. जमिनी कमी होत आहेत. उत्पन्न कमी होऊ लागले आहे. पिकांना भाव नाही. मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. शिक्षण महाग झालं आहे. त्यामुळे शिक्षणात सवलती मिळाल्या पाहिजे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. सर्वांच्या भेटी घेणार आहोत. मी मराठवाडा, विदर्भाचा देखील दौरा करणार आहे. मराठ्यांनी सत्तेवर बसवलं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आरक्षण लागणार नाही का? नेत्यांच्या बंगले बघून पोट भरणार आहे का? भाजप मंत्र्याचा बंगला बघून आपलं पोट भरणार आहे का? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केला.

गरीब मराठ्यांचं वाटोळे करण्याचं काम सुरू आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीतील नेत्यांचे मुले पैसे देऊन परदेशात शिकतात. परंतु कार्यकर्त्यांची मुले परदेशात शिकू शकत नाही. आमच्या अंगी कार्यकर्ता म्हणून गरीबी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लढत आहे. जातीचे उपकार विसरायचे नाहीत. कार्यकर्ते पक्षाचे उपकार नसताना त्यांच्यासाठी काम करत आहे. मी कितीही वाटोळे करा. मी आरक्षण घेऊनच राहणार आहे. आरक्षण रद्द कसं करतात, तेही बघतो, असे ओपन चॅलेंज मनोज जरांगेंनी दिली.