पुणे : देशात पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भाग पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने आजही महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, गुजरात आणि या १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वार्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर, गुरुग्राम तसेच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. शिवाय, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जळगावात जोरदार पावसाची शक्यता
आज पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ऊन-सावल्यांचा खेळ कायम राहणार असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.