सिल्लोड: काल रात्री सिल्लोड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी लूटमार करून दारू दुकानाचे व्यवस्थापक भिकन निळोबा जाधव यांचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी मृत भिकन जाधव यांच्या नातेवाईकांनी आज सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
शहरातील प्रियदर्शनी चौकात भराडी वाईन शॉप आहे. काल रविवारी रात्री दहा वाजता या वाईन शॉपचे मॅनेजर भिकन निळोबा जाधव व लक्ष्मण पुंजाजी मोरे हे दोघे दुकान बंद करून घरी जात होते. अज्ञात चोरट्यांनी जय भवानीनगरमध्ये भिकन जाधव व लक्ष्मण मोरे यांना अडवून त्यांच्यावर चाकू व तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम जवळपास 2 लाख रुपये लुटले. चोरट्यांच्या हल्ल्यात भिकन जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले, तर दुसरे जखमी लक्ष्मण मोरे यांच्यावर सिल्लोड येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
या घटनेतील आरोपी चोरट्यांचा आज सकाळी अकरा वाजेपर्यंत काही शोध लागला नव्हता म्हणून भिकन जाधव यांच्या संतप्त नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. सदर घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असून, लवकरच संबंधित गुन्हेगारांना गजाआड केले जाईल, असे पोलिसांनी सांगितल्यावरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी शहरातील औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर असणार्या आंबेडकर चौकात जवळपास एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.