लखपती दीदींच्या संघटित ताकदीमुळे शेतीमध्ये निश्चित आमूलाग्र बदल घडवता येईल : अनिता बनकर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : एकटा शेतकरी कदाचित बाजारपेठेशी लढू शकणार नाही. मात्र शेतकरी गट आणि लखपती दीदींच्या संघटित ताकदीमुळे शेतीमध्ये निश्चितच आमूलाग्र बदल घडवता येईल, असा विश्वास पंचायत समितीच्या सभापती अनिता बनकर यांनी व्यक्त केला.

बुधवारी (दि. ६) पंचायत समितीच्या सभागृहात पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियानाच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिता बनकर बोलत होत्या. या कार्यशाळेला गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, तुषार बरगट, कृषी मंडळ अधिकारी प्रमोद डापके, तालुका व्यवस्थापक नवनाथ पवार, शरद पाटील, पाणी फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक गणेश सूर्यवंशी, सुर्यभान बन्सोड, दादाराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आगामी खरीप हंगामासाठी पाण्याचे नियोजन, मृद संधारण आणि गट शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करणे हा आहे. विशेष म्हणजे शिर्डी येथे विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या मेंटोर्सनी यावेळी उपस्थित शेतकरी आणि महिलांना मार्गदर्शन केले. गट शेतीद्वारे खते व बियाणे खरेदी करुन खर्च कमी करणे. शास्त्रीय पद्धतीने कीड नियंत्रण आणि जैविक निविष्ठांचा वापर करुन उत्पादन वाढवणे. उपलब्ध पाण्यानुसार पिकांची निवड आणि नियोजन. मालाची थेट विक्री आणि प्रक्रिया करून नफा वाढवणे, या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सर्व प्रभाग समन्वयक, कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, समूह संसाधन व्यक्ती, बँक सखी, कृषी सखी आणि पशु सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लखपती दीदी उपक्रमाची जोड 
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे याचा संपूर्ण खर्च लखपती दीदी प्रशिक्षणाच्या निधीतून करण्यात आला आहे. महिलांना शेती व्यवसायात तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. महिलांनी गट शेती करावी, असे आवाहन या कार्यशाळेत करण्यात आले.