शहरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू, पुंडलिकनगर हादरले; नऊ जण सुखरूप

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): शहरातील पुंडलिकनगर परिसरात आज पहाटे ४.१० वाजता दोन मजली घराला आग लागली. आगेत गॅसचा स्फोट झाला असून यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यावेळी कुटुंबातील नऊ जणांना सुखरूप घराबाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. यासाठी शहरातील नगरसेवकांसह उपमहापौर यांनीही बचावकार्यमध्ये केली.

घटनेची माहिती अशी की, पहाटे सुमारे ४.३५ वाजता पुंडलिकनगरातील घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र आणि पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, पहाटे सुमारे ४.१० वाजता पुंडलिकनगर महारुद्र हनुमान मंदिराजवळ घराला आग लागल्याची माहिती ज्ञानेश्वरदाजी वाघलवाले यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि स्थानिक लोकप्रतीनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. आग एवढी भीषण होती की,  घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना मोठे आव्हान होते. घरात अनेक सदस्य अडकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि शहरातील नगरसेवक अशोक दामले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन मदतीला धावले. आग भीषण स्वरूप धारण करत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घरात अनेक सदस्य अडकले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने परिस्थितीचा वेगाने आढावा घेत बचावकार्य सुरू केले. दुकानातून निघालेल्या ज्वाळांनी काही क्षणांतच संपूर्ण घराला वेढा घातला होता. सिलिंडर स्फोटामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. धूर आणि उष्णतेमुळे घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मात्र अग्निशमन जवान आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधीनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू ठेवले. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरातील नऊ सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र सुनंदा मोरे यांना वाचविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. त्या आगीत गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

यांनी केले बचावकार्य
दरम्यान, पहाटे सुमारे ४.१० वाजता आगीची घटना घडली. घटनेची माहिती ज्ञानेश्वरदाजी वाघलवाले यांनी फोन करून लोकप्रतिनिधीना दिली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अशोक दामले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच गणेश मालकर, नारायण इंदापुरे, विशाल गायके, कांतीलाल निलपगार तसेच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे अशोक भंडारे, भालेराव यांच्यासह अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी  विनायक कदम, संजय कुलकर्णी,  छत्रपती केकान, संदीप चव्हाण, अग्निशामक जवान अशोक वेलदोडे, बाबासाहेब ताठे, अक्षय नागरे, सचिन शिंदे, मतीन शेख, विलास झरे, माधव गाडे, वाहन चालक चंदनशिव, गव्हाड, नंदू घुगे यांच्यासह आदींनी बचावकार्य केले.