काम केले की काम दाखवले ! लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून मनपात रंगल्या चर्चा

Foto
औरंगाबाद : लोकसभा मतदार संघातील निवडणुकीकरिता 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले. यानंतर जिल्ह्याचा खासदार कोण ? याची चर्चा होणे अपेक्षित असताना कुठल्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्या उमेदवाराचे काम केले. याचीच सर्वाधिक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजपचे पदाधिकारी युतीचे उमेदवार खैरे यांच्या प्रचारापासून दूरच राहिल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळाले. त्यानंतर भाजप पदाधिकार्‍यांच्या वतीने शिवसेनेने जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस सोबत असलेली युती संपुष्टात आणण्याची मागणी केली होती. शिवसेनेने ही युती संपुष्टात आणल्यानंतर  काही भाजप पदाधिकारी  खैरे यांच्या प्रचार कामात ऍक्टिव्ह झाले. दरम्यान भाजपच्या काही नगरसेवक,  पदाधिकाऱ्यांनी, युतीचे उमेदवार असलेले  खैरे यांचे काम करण्याऐवजी इतर एका उमेदवाराचे काम केले असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. याची जाणीव शिवसेनेचा थिंकटँकला देखील झाली आहे. स्थानिक राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मनपात देखील या मुद्द्यावरून अधिकारी व  पदाधिकारी वर्गात  चांगलीच चर्चा रंगत आहे. मतदानाच्या दिवशी कुठल्या परिसरात कुठल्या उमेदवाराचा अधिक जोर दिसून आला. यावरून कुठल्या पदाधिकाऱ्यांनी,नगरसेवकांनी  कुठल्या उमेदवाराचे काम केले. याचे अंदाज बांधले जात आहे. यात भाजपच्या काही  नगरसेवक,पदाधिकाऱ्यांनी युतीच्या उमेदवाराचे काम केले की त्यांना काम दाखविले याची जोरदार चर्चा सध्या मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे.