स्वतःला पंतप्रधान समजून काम करा- मोदी

Foto

नवी दिल्‍ली: सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना घाबरून कामे करू नका, तर स्वतःला पंतप्रधान समजून कामे करा, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सचिवांना अर्थात वरिष्ठ नोकरशहांना दिला आहे.

 पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी सर्व मंत्रालयांच्या सचिवांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. यावेळी सरकारचे व्हिजन मोदींनी त्यांच्यासमोर मांडले तसेच हे व्हिजन पूर्णत्वास नेण्यासाठी बिनधास्त काम करा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्‍वासही मोदींनी सचिवांना दिला. सचिवांना संबोधित करताना मोदी म्हणाले, जनतेने आम्हाला बदल घडवून आणण्यासाठी बहुमत दिले आहे. त्यामुळे जनतेच्या आशेप्रमाणे आपल्याला पुढे जाऊन काम करायचे आहे.

 जनतेचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मजबूत इच्छाशक्‍तीने काम करण्याची गरज आहे. जनतेच्या अपेक्षांना आव्हान नाही तर संधीच्या रुपात पहायला हवे.
  यावेळी मोदींनी सचिवांसाठी दोन कार्येही नेमून दिली. यामध्ये सर्व मंत्रालयांना पुढील पाच वर्षांसाठीचे लक्ष्य आणि हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणारे निर्णय यांचा समावेश आहे. असा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयांना पुढील शंभर दिवसांतच स्विकृती मिळेल, असेही मोदींनी उपस्थित सचिवांना आश्‍वस्त केले. या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पीएमओतील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण सर्वांनी स्वतःला पंतप्रधान समजून देश, समाज आणि विशेषतः गरिबांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी काम करावे. जर असे करताना आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही, ही माझी चूक असेल.