शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षाची युती झाल्याची घोषणा झाली. युतीची घोषणा झाल्याने दोन्ही पक्षामधील नेत्यांमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी गेल्या साडेचार वर्षात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो बेबनाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली आहे. मने दुभंगली आहेत ती जुळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. युतीच्या निर्णयामुळे मात्र दोन्ही पक्षातील या इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे खासदार आहेत. पण गत विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर अनेकांनी युती होणार नाही असे गृहीत धरुन लोकसभेची तयारी सुरु केली होती. खैरे यांच्याविरुद्ध स्थानिक भाजपामधील डॉ. भागवत कराड, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बस्वराज मंगरुळे यांनी निवडणुकीची तयारी पक्षाच्या आदेशानुसार सुरु केली होती. गेल्या वर्षभरापासून पक्षाच्यावतीने ही लोकसभा निवडणुक लढण्याच्या दृष्टीने बुथनिहाय बांधणी केली होती. इच्छुकांनी मतदार संघातील विविध गावांमध्ये संपर्क सभा, बैठका घेतल्या होत्या. तसेच विधानसभा निवडणुकीसाठीही सेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी करुन कामाला सुरुवात केली होती.
पूर्व मधून विद्यमान आ. अतुल सावे विरुद्ध भाजपाचे संजय केनेकर यांच्यासह सेनेचे राजू वैद्य, गजानन मनगटे यांनी ही तयारी सुरु केली होती. तर पश्चिममधून आ. संजय शिरसाटविरुद्ध भाजपातर्फे जालिंदर शेंडगे, राजू शिंदे, उत्तम अंभोरे, चंद्रकांत हिवराळे, बाळासाहेब गायकवाड हे कामाला लागले होते. मध्य मध्ये किशनचंद तनवाणी, सेनेतर्फे प्रदिप जैस्वाल इच्छुक होते. पण आता युती झाल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला आहे. बदलत्या परिस्थितीत इच्छु काय निर्णय घेतात पक्षांतर करतात की काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.