नाशिक : अखिल भारतीय संत संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. यंदाचा कुंभ भव्य-दिव्य करणार असं सांगत मुख्यमंत्र्यांनी 35 हजार कोटी रुपयांच्या कामांचा रोडमॅप मांडला. प्रभू श्रीराम आणि त्र्यंबकेश्वर नगरीत सर्व संत-महंतांचं स्वागत करत त्यांनी सनातन संस्कृतीच्या जतनावर भर दिला.
कुंभमेळ्याची तयारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील कुंभपेक्षा अधिक भाविक आले तरी सर्व सुविधा तयार ठेवणार आहोत. नाशिकमध्ये जागेची मर्यादा असली तरी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सनातन संस्कृतीने सर्व टिकून ठेवले. कित्येक आक्रमणांच्या नंतर ती आजही टिकून आहे. आपली महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय परंपरा आहे. औरंगजेबाने किती अडचणी आणल्या तरी आपली वारी परंपरा सुरू आहे. संतांच्या विचारांनी फक्त स्नान नाही तर आपलं मन देखील शुद्ध होते. यासाठी कुंभमेळा महत्त्वाचा पर्व आहे. सर्व संत महंत यांनी आम्हाला आपलेसे केले आहे. त्यामुळे यंदाचा कुंभ भव्य -दिव्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
पायाभूत सुविधा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठीही काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
साधुग्रामसाठी मोठा निर्णय
आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं.
सनातन आणि संतांवर भाष्य
सनातन संस्कृती ही कधीही नष्ट न होणारी असून अनेक आक्रमणांनंतरही ती टिकून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकरी परंपरेचा उल्लेख करत संतांच्या विचारांमुळे मन शुद्ध होतं, त्यामुळे कुंभमेळा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं.
गैरप्रकारांवर कारवाई
संत महंतांचा गैरवापर करून ज्यांनी संत संप्रदायाला, सनातनाला कलंकीत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यात गोवंश हत्या कायदा लागू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच लव्ह जिहाद संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचा इशारा देत मातेच्या धर्मानुसार संततीचा धर्म ठरवण्याबाबत भूमिका मांडली.