गंगापूर, (प्रतिनिधी) देवी दाक्षायणी मातेची यात्रा उद्यापासून सुरु होणार आहे. मराठवाड्याचे कुलदैवत लासूरगाव येथील शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर आहे. प्रसन्न अशी मूर्ती, आकर्षित करणारी विद्युत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या असल्याची अख्यायिका आहे.
देशात ही एकमेव देवी आहे जिचं पीठ या गावाखेरीज कुठेही नाही, त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे यात्रेच्यानिमित्ताने नेहमी येत असतात. या देवीच्या लासूरगावात प्रकट होण्याची आख्यायिका आहे. दाक्षायणी देवीचा वडिलांकडून अपमान झाल्यावर तिने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकराने जटा आपटून तांडव केला, आणि देवी पुन्हा लासूरगावी प्रकटली आहे.
गावातील देवीच्या मंदिराचं बांधकाम पूर्वी हेमाडपंती होते. मात्र, काळानुसार आणि मंदिराचे रुपही बदलले. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेले सुंदर कमळ आहे. मंदिरावरील नक्षीकाम देखणं आणि सुंदर आहे. त्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता याठिकाणी अनुभवायला मिळते.
एक मुख्य कळस आणि चार उपकळस असलेले हे मंदिर गावाच्या प्रत्येक कोफ्यातून नजरेस पडते. मंदिराच्या रस्त्यावर देवीला अर्पण करण्यासाठी साडी, फुलांच्या माळा आणि इतर साहित्यांची दुकाने आपेले लक्ष वेधून घेतात. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रोत्सव साजरा होत आहे. देवीच्या मंदिरासमोर भला मोठा सभामंडप आहे.
लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी या देवीची भक्तांमध्ये ओळख आहे. देवीने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतल्याची आख्यायिका असल्यानं हा यज्ञ कायम तेवत असतो. या यज्ञाचा अंगारा कपाळावर लावला की, आपण देवीला घातलेले साकडे पूर्ण होत असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकांच्या गर्दीनं हे मंदिर नेहमी फुललेले असते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मूर्ती समोर वाघाची मूर्ती आहे. ही मूर्ती एका अखंड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. गर्दीच्या काळात भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो.
तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून प्रथमच नवरात्र यात्रा उत्सवात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगेतील सपत्नीक कुटुंबीयांना देवीच्या आरतीचा मान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात्रेत हा उपक्रम सुरू असणार आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ असलेल्या माता भगिनींना विशेष दर्शन रांग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हिरकणी कक्ष, आरोग्य कक्ष, पोलीस मदत कक्ष इत्यादी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. एप्रिल मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेले असतात. वैजापूर तालुक्यातील नववधूसाठी दाक्षायणीचा आशीर्वाद ही लग्न समारंभातलीच एक प्रथा आहे. गावागावातल्या नववधू देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या सुखी संसाराला सुरूवात करतात. हे या ग्रामदैवतेचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.
--भाविकांसाठी विविध सोईसुविधा --
या मंदिरातील विद्युत रोषणाई, वाहन पार्किंग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था केली. शौचासह उन्हाची तीव्रता बघता दर्शन रांगेत ग्रीन शेडनेट तसेच भाविकांसाठी खाली मॅटिंग व्यवस्थेसह विविध सोयीसुविधा पुरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने येथे दररोज ५० हजारांवर भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती राहणार आहे.
---३२ सीसीटीव्हीच्या निगराणी --
दाक्षायणी माता मंदिराच्या परिसरामध्ये ३२ सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंदिर प्रशासनाने मंदिराच्या चहुबाजूने सर्व ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्यामुळे भाविकांची गैरसोय अथवा कुठलीही अनुचित घटना यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी सांगितले.














