सिल्लोड, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोद संयुक्त विद्यमानाने उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी योग शिक्षक कृष्णा पाटील व अशोक दांडगे यांनी कपालभाती, भस्रिका, पद्मासन, वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन, हास्यासन, सूर्यनमस्कार असे विविध योगाभ्यास विद्यार्थ्यांना शिकविले. याप्रसंगी जि प प्र शाळा मुख्याध्यापक दिलिप सपकाळ आपल्या मनोगतात सांगितले, योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचे एकत्रिकरण होय. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूप महत्वाचा आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात, तणाव आणि चिंता कमी होते,
तर एकाग्रता वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, झोप सुधारण्यास आणि जीवनाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. योगाचे महत्त्व विशद करतांनी प्राचार्य प्रदीप कानडजे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या काळात आपल्या शरीराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी योग अतिशय उत्तम उपाय आहे.
योग केवळ आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करतो असे नाही तर योग मनाला देखील शांत करतो, शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रदान करतो. याप्रसंगी सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालय व जि प प्र शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













