छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातून तरुणी व अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे १३ एप्रिल रोजी सायंकाळी कुटुंबासोबत घरी आलेली तरुणी दुकानात जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली; मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घराबाहेर खेळत असलेल्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी पुढे जाऊन एका अज्ञात वाहनावर बसून निघून गेली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत नक्षत्रवाडी परिसरात अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पैठण रोडवरील न्यू वॉटर टँकजवळील हिंदुस्थान आवास परिसरातून ही घटना घडली. रोहित कैलास पागोरे (रा. सातारा) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली. आरोपीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रणवीर करीत आहेत.











