छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षांच्या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडणार्या आरोपीस मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) अटक केली. स्वप्निल सुधाकर दांडगे (२२, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी दिले आहेत.
आरोपीशी ओळख झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी नेऊन वेळोवेळी अत्याचार केले. या संबंधांतून पीडिता गर्भवती राहिली. तिने ही बाब स्वप्निलला सांगितल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
गर्भपाताच्या गोळ्या दिल्या
शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने लग्नास नकार देत तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांच्या सेवनानंतर पीडितेला तीव्र रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
सुनावणीदरम्यान सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे जप्त करायचे आहेत. तसेच त्याने गर्भपातासाठी वापरलेली औषधे कोठून आणि कोणाकडून आणली, याचा तपास करणे आवश्यक आहे. या गुन्ह्यात त्याला इतर कोणी मदत केली का, याचाही शोध घ्यायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याल यावी. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचो रवानगी १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.












