छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) आपण पोलीस असल्याचे भासवून बनावट पोलीस ओळखपत्र व आधारकार्ड दाखवत सिटीझन लॉजमध्ये मुक्काम मिळविणाऱ्या तरुणाविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रोहिदास सातकर (वय ३१, रा. अमडापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव
आहे. आरोपीने २७ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता सिटीझन लॉज येथे आपण पोलीस असल्याचे सांगितले. तसेच स्पर्धात्मक खेळासाठी आल्याचे आणि काही दिवस राहण्यासाठी खोलीची आवश्यकता असल्याचे सांगून लॉज मालकाला आधारकार्ड व पोलीस ओळखपत्र दाखविले. मात्र, तो लोकसेवक नसतानाही पोलिसांचा गणवेश आणि त्यांच्याशी संबंधित साहित्य जवळ
बाळगून पोलीस असल्याचे भासवत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी त्याच्याकडून महाराष्ट्र पोलीस अशी नावे असलेली
दोन ओळखपत्रे, गणवेश, चार नेमप्लेट, बेल्ट, बूट, टोपी, टी-शर्ट, ट्रॅकसूट, रेनकोट, मोबाईल आणि कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार आनंद वाहुळ यांच्या फिर्यादीवरून १४ ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार मिसाळ करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions.














