छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सिडको भागात स्वतः वर गोळी झाडून घेतलेल्या समीर नाईक (३४) या तरुणाचा रविवारी (दि.२९) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूशी दिलेली तब्बल ३० तासांची झुंज अखेर अपयशी ठरली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करणारा समीर नाईक हा आई आणि धाकट्या भावासोबत राहत होता. शनिवारी (दि. २८) रात्री घरात कोणीही नसताना समीरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर रविवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. मी समीर गुरुजी नाईक स्वमर्जीने जीव देत आहे, असे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते. तपासणीदरम्यान त्याच्या खोलीत ३५० भांगसदृश गोळ्यांचा साठा, १५० ते २०० दारूच्या रिकाम्या बाटल्या, एक एअरगन आणि घटनेत वापरलेला गावठी कट्टा पोलिसांना आढळून आला होता.
गावठी कट्टा उज्जैनमधून आणल्याचा संशय
समीरचे उज्जैन येथे सतत जाणे-येणे असल्यामुळे मध्य प्रदेशातील टोळीकडून गावठी कट्टा आणि भांगेच्या गोळ्या आणल्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.










