छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कामासाठी घरातून निघालेला मध्यप्रदेशातील एक तरुण सहा दिवसांनी थेट छत्रपती संभाजीनगरात आढळून आला. दुर्दैवाने, बुधवारी (दि. २५) सायंकाळी हा तरुण क्रांती चौकातील उड्डाणपुलावरून खाली कोसळला. सुदैवाने तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी पडल्याने आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. प्रदीप परते (३०, रा. मध्यप्रदेश) असे या गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हा सहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेश येथून कामासाठी पुण्याला जातो, असे सांगून घरातून निघाला होता. मात्र तो पुण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरात आला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने आणि खिशात पैसे नसल्याने त्याची उपासमार झाली होती. तर त्याचे मित्रही त्याच्या शोधात शहरात आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रदीप अचानक क्रांती चौक उड्डाणपुलावरून खाली कोसळला. तो थेट शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याजवळ पडला. हा प्रकार घडताच पुलाखाली कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे अंमलदार अलीयार पठाण, कैलास वाघ, दुल्लत आणि मेहर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पडला की उडी मारली?
उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के यांनी प्रदीपच्या आईशी फोनवरून संपर्क साधला असता, त्याचे मित्र त्याला शोधण्यासाठी शहरातच असल्याचे समजले. पोलिसांनी त्या मित्रांना तात्काळ घाटी रुग्णालयात बोलावून घेतले. प्रदीपचा भाऊ नागपूरहून येत असून, तो आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रदीपचा जबाब नोंदवल्यानंतरच तो पुलावरून पडला की त्याने उडी मारली, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.









