चार दिवसांपूर्वी राजीव गांधी चौकात घडली होती घटना; सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उमेश संतोष भटकळ (वय २६, रा. गंगापूर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे गंगापूर शहरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी (दि. २८) रोजी रात्री सुमारे ८. ४५ वाजता राजीव गांधी चौका जवळील बंडू यांच्या चहाच्या हॉटेलच्या ओठ्याजवळ ही घटना घडली. सकाळी झालेल्या शिवीगाळीच्या वादाचा राग मनात धरून आरोपी आतिष गायकवाड याने दत्तू भक्कड याला, तू सकाळी मला आणि राहुल फुलारे यांना शिवीगाळ का केली? असा जाब विचारला.
त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत दत्तूला चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जखमीच्या आई छाया संतोष भक्कड (वय ४०, रा. गंगापूर) सखारामपंतनगर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूरचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील करीत आहेत.
-- सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आरोपींची नावे --
राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड, विशाल कापसे, या प्रकरणी पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
-- सकाळच्या वादाचा घेतला राग मनात --
सकाळी झालेल्या शिवीगाळीच्या वादातून रात्री राजीव गांधी चौक परिसरात तरुणावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमीच्या आई छाया संतोष भक्कड यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा चार दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.















