१२ तासांत तीन जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): वाळूच्या व्यवसायातील कमिशनच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला देवगाव रंगारी येथे नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली. या गंभीर घटनेचा तत्परतेने छडा लावत जवाहरनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर मुख्य सूत्रधारासह इतर पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीरचंद ऊर्फ मनीष मेहेर (रा. अजबसनगर) हे सोमवारी (दि.२०) रात्री साडेनऊच्या सुमारास सिडको येथून रिक्षाने जात असताना आरोपींनी दुचाकीवरून येत
रिक्षातून उतरवले. मागून आलेल्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून देवगाव रंगारी परिसरात नेण्यात आले. तेथे वाळूच्या सुमारे ३० ते ४० ट्रकचे मिळणारे कमिशनच्या वादातून त्यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली.
मारहाणीचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी जाफर ऊर्फ गुड्डू अयुब शेख (वय ३३), जावेद अमीन शेख (वय २०) आणि अनस अयुब चाऊस (वय १८, रा. देवगाव रंगारी) यांना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित उदय मोतीलाल मरसट ऊर्फ राजपूत हा अद्याप फरार असून, त्याच्यासह अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












