छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मित्राशी गप्पा मारत उभ्या असलेल्या सतरावर्षीय युवकाला किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला. ही घटना दि. २६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पदमपुरा परिसरातील जय टॉवरजवळ घडली. सनी अंभोरे (रा. जय भवानीनगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी सुखदेव शंकरराव भोळे (५०, रा. गल्ली क्र.२, क्रांतीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीचा मुलगा रुपेश हा २६ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. वाहनाच्या हप्त्यासाठी ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या कामासाठी तो पदमपुरा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तो घरी परतत असताना जय टॉवर परिसरात त्याचा मित्र भूपेंद्र राऊत याने त्याला आवाज दिला. त्यामुळे रुपेश त्या ठिकाणी थांबून मित्राशी बोलत उभा राहिला. तेथे एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. दरम्यान, सनी अंभोरे व त्याचा साथीदार पिल्लू कोकाटे हे दोघे तेथे आले. त्यांनी रुपेशकडे पाहत तू इथे का उभा आहेस, अशी विचारणा करीत सनीने धारदार शस्त्राने रुपेशच्या गळ्यावर वार केले. वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र ठाकूर करीत आहेत.










