हसूल पोलिस ठाण्यातच तरुणाचा विष प्राशनाचा प्रयत्न

Foto
धमकी देत तोंडाला लावली बाटली; पोलिसांमुळे टळला अनर्थ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महावितरणच्या कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच एका तरुणाने थेट पोलिस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. युनूस पटेल असे या तरुणाचे नाव असून, हसूल पोलिस ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्परता दाखवून विषाची बाटली हिसकावून घेतल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर हसूल पोलिस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिक्रमण निष्कासित केलेल्या रस्त्यावर अडथळा
ठरणाऱ्या महावितरणच्या उच्चदाब, लघुदाब वाहिन्या तसेच रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. जटवाडा रोडवरील पेट्रोल पंपासमोर हे काम सुरू असताना युनूसने काम थांबवले. याबाबत मनपाचे अभियंता रोहन खरात यांनी याबाबत तक्रार देण्यासाठी हसूल पोलिस ठाणे गाठले.
गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच युनूसने हर्सल पोलिस ठाण्यात धाव घेत माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी येथेच विष पिऊन जीव देईन अशी धमकी देत विषाची बाटली तोंडाला लावली. पोलिसांनी विषाची बाटली ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी युनूस पटेलवर पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील लामा करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions