मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र आरक्षण तातडीने लागू करावे अशी मागणी करीत मराठा समाजाने पुन्हा एकदा मोर्चे काढणे सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातही मराठा क्रांती मोर्चा सह इतर संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले. जालना जिल्ह्यातून शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते पायी दिंडी घेऊन विभागीय आयुक्तालयात आज दुपारी दाखल झाले.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोप अनेक संघटना करीत आहेत. राज्यभर विविध संघटना आंदोलन करीत असताना जालना जिल्ह्यातील रोहिलागड येथील तरुणांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पायी दिंडी चा मार्ग अवलंबला. काल सकाळी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, बाळासाहेब काळवणे, योगेश भोजने, रवी काळवणे, राहुल राक्षे आधी तरुणांनी निवेदन देण्यासाठी पायी दिंडी काढली. आज दुपारी एकच्या सुमारास हे तरूण विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी हजर झाले. मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करावे, असे निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर केले.