नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दुसऱ्या विभागात आपली बदली केल्याच्या रागातूनमध्यरात्री महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. हे जेंव्हा उघडकीस आले तेंव्हा हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून मध्य रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. तसेच विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने हा मेसेज केला होता. त्यामुळे, या कृत्याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले आहे.
दरम्यान, निलंबन काळात आनंद सावंत यांना कुठलीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, तसेच निलंबन काळातील त्यांचे मुख्यालय गाव पंचायत हेच असणार आहे. या काळात त्यांना निलंबित निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहिल, असेही आदेशात म्हटले आहे.