जिल्हा परिषद, पं.स. निवडणुकीसाठी युती

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला. वैजापूर तालुक्यात कमी जागा मिळाल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत नेत्यांना घेराव घातला. मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली.
कोकणवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भाजप २७ तर शिवसेना २५ जागा लढविणार असून सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील ११ जागा मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत.  कोकणवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. २०) दुपारी २ वाजेपासून भाजप आणि शिवसेनेची जिल्हा परिषद युतीबाबत बैठक सुरू होती. यावेळी भाजपचे बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते तर शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, जिल्हाध्यक्ष रमेश पवार आदींची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही असेच कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र त्यांना समजावल्यानंतर त्यांनी ऐकले आणि पक्षाच्या कामाला लागले. तसेच हे कार्यकर्तेही आम्ही समजावल्यानंतर ऐकतील आणि पक्षाच्या कामाला लागतील, असा विश्वास मंत्री अतुल सावे त्यांनी व्यक्त केला.