पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण अशक्य, कुणाच्या कोट्यातून काढून देत आहात ते सांगा- अमित शहा

Foto

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याप्रमाणेच विविध राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकांमध्ये टीआरएसने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला असून त्याला विरोध करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५०  टक्क्यांच्यावर आरक्षण देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

 

अमित शहा यांनी परक्कल आणि निर्मल येथील प्रचार सभेत आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्वाचे विधान केले होते. मी चंद्रशेखर राव यांना सांगू इच्छितो की, सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण आरक्षणावर ५० टक्क्याची कॅप बसवली आहे. तेव्हा तुम्हाला १२ टक्के आरक्षण द्यायचे असल्यास दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या कोट्यामधून ते द्यावे लागेल. मग कुणाच्या कोट्यामधून हे आरक्षण देणार आहात ते सांगा, असा सवाल करत त्यांनी चंद्रशेखर राव यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला.तेलंगण विधीमंडळाने मुस्लीम समुदायाच्या मागासवर्गीयांसाठी रोजगार आणि शिक्षणात आरक्षण वाढवून चार टक्क्यांऐवजी १२ टक्के केले आहे. मात्र त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. त्यावरून तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)चे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे प्रचारसभांमधून मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. त्याला उत्तर देताना अमित शहांनी हे विधान केले होते. मात्र त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.