मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूर येथील विभागप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दुनबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दुनबळेंच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अशी माहिती आहेे की, दहा ते अकरा जणांनी दुनबळेंवर लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला केला. बळे यांना काही कळण्याच्या आत हल्लेखोर त्यांच्यावर तुटून पडले. दुनबळे रक्तबंबाळ होऊन खाली पडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर तलवार आणि रॉडने वार करण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. दुनबळे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून असून त्यांना २२ टाके पडल्याची माहिती आहे.
हल्लेखोर फरार असून चेंबूर पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. आज (रविवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुनबळेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. चेंबूर आणि सायन हॉस्पिटल येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. चेंबूर पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहे.
















