जयदेव ठाकरेंची अखेर माघार, बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद मिटला

Foto

मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या संपत्तीवरुन त्यांचे पूत्र जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण संपत्ती आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाणार आहे.

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला जयदेव यांनी आव्हान दिले होते.  बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची  संपत्ती फक्त १४.८५ कोटी रुपये असल्याचे सांगितले गेले होते. जयदेव यांचे म्हणणे होते की एकट्या मातोश्री निवासस्थानाची किंमत ही ४० कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय बाळासाहेबांच्या अनेक स्थावर मालमत्ता आहेत, त्यांचा उल्लेख मृत्यूपत्रात नाही. बाळासाहेबांच्या स्वाक्षरीबद्दलही जयदेव यांनी याचिकेत शंका घेतली होती. बाळासाहेब ठाकरेची अखेरच्या दिवसात प्रकृती अतिशय खालावली होती, त्यामुळे ते मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करु शकणार नाही असा दावा जयदेव यांनी केला होता.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरेंचे मुंबईत निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करुन घेण्यासाठी उद्धव यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. त्याला जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. हे मृत्यूपत्र दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यातील मजकुराबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली होती.