औरंगाबाद – झोपेतच केस कापण्याच्या प्रकाराने मागील वर्षी देशभरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. शहरातही 3 मुलींच्या केसांवर कात्री फिरवण्याच्या घटना समोर आल्या होत्या, मात्र या घटनांचा उलगडा होऊ शकला नाही. एकवर्षानंतर आता पुन्हा शहरात 'चोटीगँग' अवतरल्याची अफवा असून यामुळे महिला आणि मुलींमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सोमवारपासून शाळा सुरु होत असल्यामुळे पालकवर्गही चिंतीत आहे.
वर्षभरापूर्वी होती चोटीगँगची दहशत
महिलांची वेणी कापण्याचे प्रकार सर्व प्रथम
उत्तर भारतात समोर आले होते. काही दिवसातच हे लोण संपूर्ण देशात पसरले होते.
औरंगाबाद शहरातही महिला आणि मुलींचे केस कापल्याच्या घटना छावणी परिसर आणि इतर
काही ठिकाणी घडल्या होत्या. बेगमपुरा परिसराताल एका ४० वर्षीय मेसचालक महिलेची
छावणीच्या आठवडी बाजारात वेणी कापण्यात आल्याची घटना घडली होती. महिला भाजीपाला
खरेदीसाठी गेली असताना ही घटना घडली होती. दुसरी घटना ही शाहनूर मियाँ दर्गा
परिसरात राहणाऱ्या दोन शाळकरी सख्ख्या बहिणींसोबत घडली होती. दोघी बहिणींची वेणी
कापण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटना शहरात इतरत्रही घडल्या होत्या. मात्र पालकांनी या बाबत पोलिस तक्रार केली
नसल्यामुळे या घटनांची नोंद झालेली नव्हती.
सत्यता आणि अंधश्रद्धा यांतील अंतर धुसर
अज्ञात व्यक्ती येऊन मुली आणि महिलांच्या
केसांवर कात्री फिरवून जात असल्याच्या चर्चांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले
होते. या घटनांमागील सूत्रधार अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे काही जणांनी याला
काळी जादू किंवा करणी अशा प्रकारचे नाव देऊन पोलिसांचा ससेमिरा टाळण्याचा प्रयत्न
केला होता. त्यासोबतच अशीही अफवा होती, की एक विचित्र प्रकारचा किडा केसांमध्ये
जाऊन तो वेणी कापत आहे. व्यक्तीपरत्वे या घटनांमागील कारण वेगवेगळे समोर येत
असल्यामुळे यात सत्यता किती आणि अंधश्रद्धा किती याचा उलगडा होऊ शकला नव्हता.
मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या अफवा पसरत असल्यामुळे महिला आण मुलींमध्ये
भीतीचे वातावरण आहे.
शहरातील बेगमपुरा,
जयसिंगपुरा,
भीमनगर,
या जुन्या
वसाहतीमध्ये रात्री १२ ते पहाटे
३ वाजताच्या दरम्यान नळाला पाणी येते. पाणी भरणाऱ्या महिलांची वेणी कापली जात
असल्याची अफवा मागील काही दिवसांपासून पसरली आहे. त्यामुळे महिला डोक्याला रुमाल
किंवा स्कार्फ बांधून पाणी भरत आहेत. हिवाळा सुरु झाला असल्यामुळे अंधारही लवकर
पडत असून रात्रीचे बाहेर फिरणेही महिलांनी टाळले आहे.
(प्रतिकात्मक फोटो)












