औरंगाबाद – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा २०१९ साठी आघाडी पक्की झाली असून ४० जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. औरंगाबादसह इतर चार जागांवरुन मात्र आघाडीत बिघाडी होते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण इच्छूक आहेत, तर काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाने काँग्रेसचा विश्वास वाढला आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस
आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. राज्यातील
लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांवर दोन्ही पक्षांचे एकमतही झाले आहे. जागावाटपाचा तिढा
अडला आहे तो औरंगाबाद, दक्षिण अहमदनगर, पुणे आणि उत्तर मुंबई या मतदारसंघांवर. राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी
असे औरंगाबाद दौऱ्यात म्हटले होते. काही काँग्रेस नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन ही
जागा राष्ट्रवादीने लढली तर विजय मिळू शकतो असे सांगितले होते. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे औरंगाबाद
लोकसभा लढवण्यास इच्छूक आहेत. काँग्रेस मात्र मराठवाड्याच्या राजधानीची ही जागा
सहजासहजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत टाकण्यास तयार नाही.
आमदार सत्तार यांचे शक्तीप्रदर्शन
काँग्रेसच्या जनसंघर्ष
यात्रेचा १ नोव्हेंबरला औरंगाबादेत समारोप झाला. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी या सभेला उपस्थित
होती. एवढेच नाही तर काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी
मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते
गुलामनबी आझाद देखील या सभेला उपस्थित होते. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर
झालेल्या या जंगी सभेत सर्वच नेत्यांनी जिल्हाध्यक्ष आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल
सत्तार यांचे अभिनंदन केले. आगामी लोकसभा निवडणुकीची नांदी म्हणून या सभेकडे
पाहिले जात होते. आमदार सत्तार यांनी देखील जोरदार शक्तीप्रदर्शन करत सिल्लोड नंतर
दुसऱ्याच दिवशी औरंगाबादमध्ये सभा घेऊन औरंगाबाद लोकसभेसाठी आपली तयारी पूर्ण
असल्याचे नेत्यांना दाखवून दिले.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश
अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी औरंगाबादची जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे संकेत
आपल्या भाषणातून दिले. सभेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेतही त्यांनी कोणतेही
आढेवेढे न घेता औरंगाबाद मतदारसंघ काँग्रेसकडेच राहाणार असल्याचे स्पष्ट सांगितले.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त मराठवाड्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांनाही विश्वास निर्माण
झाला आहे, की आमदार सत्तार हेच शिवसेनेचा बालेकिल्ला खिळखिळा करु शकतात. त्यामुळे
काँग्रेस आता औरंगाबादच्या जागेवरील आपला हक्क सोडण्याची शक्यता कमी आहे.
नगर दक्षिण-पुणे-उत्तर
मुंबई या जागांवर अजून एकमत नाही
दक्षिण अहमदनगर ही लोकसभेची जागा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना लढवण्याची इच्छा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ही जागा सुजय विखे लढवतील असे जाहीर केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दक्षिण अहमदनगरजी जागा राष्ट्रवादीच लढवणार असे म्हटले आहे. यामुळे ही जागा आता दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाली आहे. पुणे लोकसभेची जागाही राष्ट्रवादीला हवी आहे. उत्तर मुंबईची जागा लढवण्याचीही राष्ट्रवादीची तयारी आहे. या चार जागांवर आघाडी जागावाटपाची चर्चा शुक्रवारी अडली. लोकसभा निवडणुकीला आता अवघे सहा महिने राहिले आहेत. तेव्हा आणखी दोन-तीन बैठका होऊन या चार जागांचा तिढा सुटेल असे म्हटले जाते.