बीड : राज्य सराकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर काढल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. हैदराबाद गॅझेटच्या जीआरला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे. मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश करू नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी ओबीसींची मागणी आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान या गॅझेटच्या जीआरला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील शिंगरवाडी फाटा येथे सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे.
परळीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या विरोधात कलम 1994 BNS, 196, 997, 298, 299, BNS 124 आणि इतर कलामांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवराव रामराव लुगडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हाकेंविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते. पोलीस स्टेशन समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे, हाकेंना अटक करावी, त्यांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान दुसरीकडे बीडच्या नेकनूरमध्ये देखील हाके यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जगन्नाथ घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून हाके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाके यांनी मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या प्रकरणात आता कालपासून लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हाके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.