भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे

Foto

मुंबई- वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या भीमा-कोरेगाव दंगलीतील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.३०) विधानसभेत केली. मात्र पोलिसांवर केलेल्या हल्ल्यांचे गुन्ह मागे घेणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस एकूण ५४३ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४६ गंभीर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच भीमा-कोरेगाव दंगलीत दाखल झालेल्या ६५५ गुन्ह्यांपैकी ६३ गुन्हे वगळता ईतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, भीमा- कोरेगाव दुर्घटनेनंतर ६५५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १५९ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. २७५ गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल झाली होती. ती २७५  प्रकरणे मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १५८ प्रकरणे तपासांतर्गत असून त्यातही चार्जशीट दाखल करुन मागे घेण्याची कार्यवाही होईल. ६३ गुन्ह्यांमध्ये पोलिसांवरील हल्ले व इतर अनुषंगाने सबळ  पुरावे उपलब्ध असल्याने ते मागे घेतले जाऊ  शकत  नाहीत असे फडणवीस म्हणाले.