औरंगाबाद- शहरात गेल्या अनेक महिन्यापासून निर्माण झालेला कचर्याचा प्रश्न महापालिकेला सोडवता आलेला नाही. कचर्याचा प्रश्न गंभीर झाला असून त्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा प्रश्नावर सरकारला औरंगाबादकरांची काळजी आहे का? असा प्रश्न विधान परिषदेतही उपस्थित करण्यात आला होता मात्र अजूनही महापलिका प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र शहरातील कचर्यावरून दिसून येत आहे. या कचर्याचे खापर सध्या शिवसेनेवर भाजपकडून फोडल्या जात असून शहरातील विविध विकास कामे आम्हीच केली असल्याचा दावा मात्र भाजपकडून केला जात आहे. श्रेयवादाच्या या लढाईत भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकवेळा महापौर नंदकुमार घोडेले
यांची कचरा प्रश्नावरून भाजपकडून कोंडी केली जाते. सभागृहातील भाजपचे सदस्य
महापौरांवर प्रश्नांचा भडिमार करून शिवसेनेपुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न
करत असल्याचे नेहमीच दिसून येते. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखाच्या
आसपास गेली असून शहरातील नागरीकांना महानगरपालिकेकडून वेळेवर मुलभूत सोई-सुविधा
उपलब्ध होत नाही. राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रूपयांचा निधी
देवून वर्ष झाले मात्र अद्यापही रस्त्याचे कामांचे महापालिकेकडून
भिजत घोंगडे आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे काम दिलेल्या रॅमकी
संस्थेच्या बाबतीत लवादाने मनपास दंड लावला आहे. कचर्याचा प्रश्न संपूर्ण राज्यात
गाजत असून पर्यटनाची राजधानी अशी ओळख असणार्या शहरात कचर्याच्या प्रश्नांमुळे
पर्यटकांची संख्या देखील घटली आहे. शहरात हजारो टन कचरा जैसे द पडून
आहे. दिवसेंदिवस एकाच जागी हा
कचरा पडलेला असल्याने तो सडत आहे. परिणामी विविध
आजार पसरून शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.महानगरपालिका
कचरा प्रश्न सोडविण्यात पुर्णपणे अपयशी ठरली असून कचर्याचे खापर भाजप ने
शिवसेनवर फोडले आहे. त्यामुळे आता शहरातील शिवसेनेचा “कचरा” अन “विकास” कामाचे
श्रेय भाजपचे असा श्रेयवादाचा कलगितुरा सत्ताधारी भाजप अन शिवसेनेत सुरू झाला आहे.