धुळे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. दरम्यान धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलगा नरेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील हे आंदोलन करु शकतात अशी शक्यता वर्तवून पोलिसांनी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले आहे.
कोण होते धर्मा पाटील
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. असे असले तरी त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्याकडे चार एकर जमीन होती. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला भरपाई कमी मिळाल्याचे धर्मा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आपली लढाई सुरू केली. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळाले नाही. याचा निषेध म्हणून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केरून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर सरकारने पाटील यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे सामुग्रह अनुदान देऊ केले. सरकारचे हे अनुदान पाटील कुटुंबीयांनी नाकारले. आम्हाला अनुदान नको, तर मोबदला हवा अशी स्पष्ट मागणी पाटील कुटुंबीयांनी सरकारकडे केली होती.