धोकादायक विद्युत रोहित्र इतरत्र हलवण्याची मागणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : विद्याधन इंग्लिश स्कूलजवळील रोहित्र तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची नागरिकांची मागणी लक्ष्मी नगर भाग्यातील नागरिकांनी सहाय्यक अभियंता महावितरण यांच्याकडे केली आहे परंतु त्यांनी या संदर्भात हात झटकले आहे. 

लक्ष्मी नगर, कॉलनी परिसरात विद्याधन इंग्लिश स्कूल तसेच नागरिकांच्या घरांजवळ धोकादायक स्थितीत असलेली विद्युत डीपी (रोहित्र) तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु सहाय्यक अभियंता वंगळ यांनी नागरिकांना उडवाढीचे उत्तर दिले आहे.

मुख्य रस्त्याचे काम सुरू असताना सदर विद्युत डीपी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आली होती. मात्र सध्या ही डीपी नागरिकांच्या मुख्य रस्ता, शाळा, घर व दुकानांपासून जवळ असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदर डीपीमधून वारंवार ठिणग्या व जाळ बाहेर पडणे, स्फोटासारखे आवाज येणे तसेच विद्युत बिघाडाची लक्षणे दिसून येत आहेत. 

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः डीपीजवळ असलेल्या विद्याधन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सदर डीपीच्या परिसरात विजय राधाकिसन सुरासे, राजेंद्र जाधव, मनोज चव्हाण, अनिल सुरासे, महादेव गवारे तसेच देशमुख किराणा दुकान यांसह अनेक घरे व दुकाने आहेत. या परिसरातील सुमारे १० कुटुंबांतील ५० नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यात विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यात कोणतीही दुर्घटना, आग अथवा जीवित वित्तहानी होण्यापूर्वी महावितरणने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच धोकादायक डीपी सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे, फाअशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून सदर डीपीची तांत्रिक तपासणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ती योग्य व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर विजय सुरासे, सतीश आहेर, अनिल सुरासे, राजेंद्र जाधव, उद्धव गवारे, मनोज चव्हाण व नंदकिशोर देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-- महावितरण अधिकाऱ्यांनी हात झटकले -- 
वरील भागातील डीपी हलविण्यात यावी या संदर्भात नागरिकांनी अभियंता वंगळ यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी ही आमची जबाबदारी नाही तुम्ही स्वखर्चाने ही डीपी हलवावी असे सांगून हात झटकले.