केंद्रीय पथकाकडून दुष्काळ पाहणीचा फार्स, शेतकऱ्यांचा संताप

Foto

औरंगाबाद- यंदा अत्यल्प पावसामुळे राज्य सरकारने निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाठविलेले पथक सध्या राज्याच्या दौर्‍यावर आहे. गेले दोन दिवस केंद्राचे पथक मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाहणी करत आहे. हे पथक वार्‍याच्या वेगाने पाहणी करत असल्याने शेतकर्‍यांत तीव्र संतापाचे वातावरण असून, दुष्काळ पडताळणी हा निव्वळ फार्स आहे की काय, अशा संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जात आहेत. 

 

नेहमीच येतो पावसाळा याप्रमाणे मराठवाड्यात नेहमीच येतो दुष्काळ अशी म्हण रूढ झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मराठवाडा विभाग दुष्काळाच्या संकटाशी तोंड देत आहे. दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीने केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणी दौरा केला होता. त्यावेळी दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारला काहीसा विलंब झाला. त्यामुळे संतप्‍त शेतकर्‍यांनी केंद्रीय पथकाच्या गाड्या अडवल्या, पथकासोबत वादही घातला. यावेळी मात्र अगोदर दुष्काळ जाहीर झाल्याने पथकाला फारसा विरोध झाला नाही;परंतु धावत्या दौर्‍यात दुष्काळ पाहणीला संतापाची फोडणी मात्र जरूर मिळाली. 

 

राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडे दुष्काळग्रस्तांसाठी मदतीची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव आल्यानंतर केंद्राने मदत देण्यापूर्वी दुष्काळ पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले दोन दिवस केंद्राचे पथक औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाहणी करत आहे. या पथकातील अधिकारी ठराविक ठिकाणी जाऊन दुष्काळाची ङ्गधावती पाहणीफ करत आहेत. केवळ दहा-पंधरा मिनिटांच्या पाहणीत या पथकाला दुष्काळाची तीव्रता कशी समजणार, असा प्रश्‍न शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे.

 

दुष्काळ पाहणी करताना पथकाने किमान दोन दिवसाचा वेळ एका जिल्ह्यासाठी द्यावा, असे बोलले जाते. भूगर्भातील पाणी पातळी, सिंचन प्रकल्पाची स्थिती याची सखोल माहिती केंद्रीय पथकाने घेतली असती तर दुष्काळ निवारण कामाला मदत झाली असती, असे काही अधिकारी खासगीत सांगतात. केंद्रीय पथकाने जिल्ह्यासाठी किमान दोन अधिकारी नियुक्‍त करून दोन ते तीन दिवस त्या जिल्ह्यात तळ ठोकून राहिले पाहिजे. दुष्काळाचा आढावा घेताना आता मंडळनिहाय दुष्काळ गणला जातो ही स्थिती लक्षात घेता केंद्रीय पथकाने अति तीव्र दुष्काळ मंडळातही पाहणी करणे आवश्यक आहे. या दौर्‍यात अवघ्या तीन गावांना भेटी आणि एक सिंचन प्रकल्पाचा अभ्यास केल्यावर संपूर्ण जिल्ह्याची माहिती पथकाला होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. दुष्काळाच्या वेदना भयंकर आहेत. ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, जनावरांना चारा नाही, शेतात खाण्यापुरतेही पिकले नाही. अशा स्थितीत दुष्काळ पडताळणी म्हणजे निव्वळ फार्स असल्याची टीका केली जात आहे.विभागीय आयुक्‍तालयाच्या एसी हॉलमध्ये जितका वेळ या पथकाने घालवला, किमान तेवढा वेळ शेतकर्‍यांच्या शेतावर दिला असता तर बरे झाले असते, अशी खोचक प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखविली.

 

दरम्यान, पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा यांच्यासह कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए.के. तिवारी, कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे यांनी बुधवारी गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी डॅम, मुरमी व सुलतानपूर या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणी दरम्यान कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  देवयानी पाटील डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  पवनीत कौर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.