औरंगाबाद- माजी शिक्षममंत्री राजेंद्र दर्डा आणि खा. चंद्रकांत खैरे यांची मैत्री सर्वसूत आहे. निवडणुका आल्या की हे दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावतात. तसेच निवडणुकातही एकमेकांना जाहीर मदत करतात हे राजकीत वर्तुळात माहीत आहे. उद्या खा. चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने एक दिवसांपूर्वीच आज सकाळी माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी खा.खैरेंच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या "ऍडव्हान्स" शुभेच्छा दिल्या. आता या शुभेच्छा खैरेंच्या राजकीय भविष्यासाठी आगामी लोकसभेच्या निमित्ताने होत्या की केवळ वाढदिवसाच्या होत्या याबाबत विविध चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मागील निवडणुकीत माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा पूर्व विधानसभा मतदार संघात दारुण पराभव झाला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र स्वतःच्या वाढदिवसापासून त्यांनी जोरदार कम बॅक करत शहरातील विविध राजकीय कार्यक्रमात आपली आवर्जून हजेरी लावली आहे. खा. चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राजेंद्र दर्डा हे शहरात नसल्याने त्यांनी एक दिवसांपूर्वीच खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरी सकाळीच हजेरी लावून खासदार खैरेंना वाढदिवसाच्या "ऍडव्हान्स" शुभेच्छा दिल्या. हे विशेष. खैरे यांना शुभेच्छा देताना दर्डा यांच्या समवेत महापौर नंदकुमार घोडले, राजेंद्र दर्डा यांचे कट्टर समर्थक पंकज फुलपगर, शिवसेनेचे राधाकृष्ण गायकवाड यांचीही उपस्तीती होती.
शिवसेनाप्रमुखांचा नकळत दर्डांना आशीर्वाद-
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा पाठीमागे लावली आहे. या प्रतिमेत खासदार खैरे शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद घेतांना दिसतात. मात्र आज खैरेंच्या छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यातून अचुकरित्या माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा फोटो घेतला. या फोटोमध्ये दर्डा यांच्यावर शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद असल्याचे नकळतपणे दिसून येते. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात कमालीचे कुतुहल निर्माण झाले आहे.
















