जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, समृद्धी महामार्गात जमीन जाऊन झाला भूमिहिन

Foto

रंगाबाद – समृद्धी महामार्गासाठी सरकारने शेत जमीन संपादित केल्यानंतर भूमिहिन झालेल्या शेतकऱ्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचे हे कृत्य वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील अनर्थ टळला आहे. मात्र या प्रकरणाने समृद्धी महामार्गासाठी जमीनी दिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मृत्यूला कवटाळत आहेत.  

 

कुठे झाला आत्मदहनाचा प्रयत्न

महाल पिंप्री येथील शेतकरी रुपचंद श्रीवास्तव यांची शेत जमीन समृद्धी महामार्गासाठी सरकारने संपादित केली आहे. अधिग्रहित जमीनीचा योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह पालकमंत्र्यांकडेही केली होती. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. सरकार दाद देेत नाही यामुळेे त्रस्त झालेल्या रुपचंद यांनी अखेर मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेतकऱ्याच्या हातातील रॉकेलची बाटली हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

 

सरकारने झटक्यात जमीन घेतली, आता मोबदल्यासाठी मारव्या लागतात खेट्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गसाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेण्यात आल्या आणि त्यांना भूमिहिन व्हावे लागले आहे. शेतजमीन गेल्यानंतर मोबदला तरी लवकर मिळेल आणि उपजीविकेचे साधन उभे करता येईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचे आज औरंगाबादेतील शेतकऱ्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाने समोर आले आहे.

 

मोबदल्यासाठी वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात केले होते विष प्राशन

धुळे येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी याच वर्षी जानेवारीमध्ये मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धर्मा पाटील यांची पाच एकर बागायत शेती औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. याचा मोबदला म्हणून त्यांना चार लाख रुपये भरपाई  देण्यात आली होती. मात्र त्याचवेळी इतर शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळाला होता. आपली शेती बागायत होती आणि आपल्यालाही अधिक मोबदला मिळावा यासाठी धर्मा पाटील तीन महिन्यापासून मंत्रालयात खेट्या मारत होते. मात्र मंत्री त्यांना भेटायलाही तयार नव्हते. यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही, का असा सवाल उपस्थित होत  आहे.