जन्मदात्या बापानेच केली होती त्या चिमुकल्यांची हत्या !

Foto

वैजापूर- तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत सापडलेल्या दोन मुलांच्या खुनाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. त्या दोन मुलांना निष्ठुर बापानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलुन ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन पोलिस त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवत असल्याची माहिती मिळाली आहे. ही दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील रहिवासी असुन त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (वय ३) व गणेश संतोष वाळुंजे (वय ५) असल्याचे कळते.  


पोलिसांनी संशयित बापास ताब्यात घेतले असुन त्याची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच आरोपीला गजाआड केले जाण्याची शक्यता आहे. वैजापूर तालुक्यातील बापुसाहेब कल्याण पवार यांच्या सावखेडगंगा येथील शेतगट नंबर दोनमधील विहिरीत शनिवारी दुपारी दोन मुलांचे मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मुलांच्या शर्टावरील प्लेग्रुप जेऊर या नावावरुन ही मुले त्या शाळेतील आहेत का याचा तपास घेण्यात आला. मात्र या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले. 


वाळुंजे कुटुंब औरंगाबाद रस्त्यावरील गल्ले बोरगाव येथे राहत होते व संतोष वाळुंजे हा औरंगाबाद येथे काम करत होता. पत्नीशी कडाक्याचे भांडण झाल्याने  दोन्ही मुलांना घेऊन तो सावखेडगंगा परिसरात आला व त्याने दोन्ही मुलांना निर्दयीपणे विहिरीत ढकलुन संपवले. याबाबत माहिती मिळताच वीरगाव पोलिसांच्या पथकाने संतोष वाळुंजे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.