टीव्हीवर सिनेमा पाहून चौथीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास

Foto

औरंगाबाद - चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्याघरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बुधवारी वाळूज परिसरातील सिडको महानगर येथे ही घटना घडली आहे. ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही संचावर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासचा मृत्यू झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.   

 

टीव्ही पाहाता पाहाता घेतला गळफास 

विकास मछिद्र पवार वय ११ वर्ष( रा.सिडको महानगर , वाळूज परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विकास  हा एकुलता एक होता, त्याला दोन बहिणी आहेत. विकासचे वडील हे माजी सैनिक आहेत. विकासाचे आई वडील दोन्ही औद्योगिक वसाहतीत खाजगी नोकरी करतात. बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे ते कामावर गेले होते. तर दोन्ही बहिणी शाळेत गेल्या होत्या. विकास घरी एकटाच होता.

संध्याकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी शाळेतून घरी आल्यावर विकासने  ओढणीच्या साह्याने  पंख्याला गळफास घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. लहान भावाला अशा आवस्थेत पाहून दोन्ही मुली भेदरल्या, त्यांनी लागलीच वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिली. वडिलांनी तातडीने घरी पोहोचत विकासला फसावरून खाली उतरवत हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. ११ वर्षीय विकासने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला. याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश आंतरप हे करीत आहेत.

 

सिनेमा पाहून केली आत्महत्या? 

दोन्ही बहिणी जेंव्हा शाळेतून घरी आल्या त्यावेळी घरातील टीव्ही संच सुरू होता. त्यावर सिनेमा चालू होता. सिनेमामधील दृष्य पाहूनच विकासने स्टंट करण्याचा प्रयत्न केला असावा, त्यातच त्याला गळफास बसून त्याचा मृत्यू झाला असण्याची शंका व्यक्त करण्यात  येत आहे. हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.