मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही -गडकरी

Foto

नवी दिल्‍ली- २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार असल्याचे वृत्त केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी फेटाळले आहे. मी पंतप्रधान बनण्याची कोणतीही शक्यता नाही. आता याक्षणी माझ्याकडे जे पद आहे, त्यावर मी खूश आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपची धुरा नितीन गडकरींच्या हातात दिली असती तर मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपची सत्ता हमखास आली असती तसेच छत्तीसगड व तेलंगणात भाजपची दैना झाली नसती. त्यामुळे २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एका पत्राद्वारे केली होती. या मागणीमुळे गडकरी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपद उमेदवारीच्या शर्यतीत उतरणार आहेत का? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगत गडकरी यांनी या वादावर पडदा टाकला आहे. माझे पहिले प्राधान्य गंगा स्वच्छ करणे हे आहे. चारधामांसह अन्य स्थळांसाठी चांगले रस्ते बनवायचे आहेत. ही कामे करण्यातच मला आनंद असून ही कामे मला लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजप विजयी होणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, तीन राज्यांतील भाजपला सत्ता गमवावी लागली. मी हा पराभव म्हणून मानत नाही. ज्या काही त्रुटी असतील त्यावर आम्ही पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करू. आम्हीच निवडणूक जिंकू व पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील. विरोधी पक्षांनी महाआघाडी करणे हा त्यांचा असहाय्यपणा आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव वाढत असल्यामुळेच कालपर्यंत एकमेकांना दुर्लक्षित करणारे पक्ष आज एकमेकांचे कौतुक करून एकमेकांना मिठ्या मारत आहेत. राजकारण हा तडजोड व मर्यादेचा खेळ आहे.