नांदेड- मराठा समाजाला मिळालेले आरक्षण आणि
त्याच्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणावरून पेटलेल्या वादात पंकजा मुंडे यांनी आता
थेट सहभाग घेतला आहे. त्या म्हणतात धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी परत
मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही.धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर ही काठी
उगारायला मागे- पुढे पाहणार नाही, असे
देखील त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेत धनगर आरक्षण
जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पंकजा मुंडे,
महादेव
जानकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला
संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला जाहीर
वचन देते की धनगर समाजाला आरक्षण मिळणारच. धनगर समाजाने पुन्हा एकदा भाजपाला साथ
दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. धनगर
आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीबाहेरही जाण्याची तयारी आहे. तुमच्यासोबत
मेंढरांमागे येण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजामुळे आज सत्तेत आहोत हे
आम्ही विसरणार नाहीत. आरक्षण तर देणारच पण ते मिळेपर्यंत समाजासाठी विकास योजना
राबवू. आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्यास मी सर्वाच्या पुढे राहील, त्यात राजकारण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मला सत्तेची लालसा नाही. आरक्षणाचा मुद्दा
मार्गी लागेपर्यंत मंत्रालयातील दालनातही प्रवेश करु शकणार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले.
















