औरंगाबाद- शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यावर बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे म्हणाले की इम्तीयाज जलील यांनी खुशाल विरोध करावा, शिवसेना त्यांच्या विरोधाला जुमानत नाही. त्यांचा विरोध विचारात घ्यावा इतके काही ते मोठे नाहीत.
देशात सध्या नामांतराचे वारे जोरात वाहत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदीत्यनाथ यांनी ज्या पध्दतीने उत्तरप्रदेश मधील परकीय आक्रमकांच्या नावाने
असलेल्या शहरांची नावे बदलण्याचा धडाका लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर
महाराष्ट्रातील औरंगाबाद चे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर
करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने पुन्हा एकदा जोरात लावून धरली आहे. मात्र
एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी तीव्र विरोध करत ते म्हणाले की कचऱ्यामुळे
प्रसिध्द असलेल्या शहराला संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाचे नाव देऊन त्यांचा
अपमान करण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे.
याच्या प्रतिउत्तरादाखल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे सांजवार्ता
ऑनलाईनशी बोलताना म्हणाले की नामांतरास विरोध करणारा इम्तीयाज जलील कोण आहे? असे
कुणीही उठसूठ विरोध करत असेल तर शिवसेना त्यांच्या विरोधाला अजिबातही जूमानत नाही.
जलील यांना त्यांचे नाव बदलायचे सांगितल्यास ते बदलणार नाहीत कारण त्यांना
त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्याही पेक्षा जास्त आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान
आहे. तेव्हा औरंगाबादचे नामांतर करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एका प्रश्नाला
उत्तर देताना दानवे म्हणाले की विकासाची भाषा जलील यांनी आम्हाला शिकवू नये. विकासाबाबत
बोलणाऱ्या जलील यांनी त्यांच्या मतदारसंघात चार वर्षात काय दिवे लावलेत हे आधी त्यांनी
सांगावे.
नामांतर हा आमच्या धार्मिक अस्मितेचा प्रश्न असून परकीय आक्रमकांची नावे आम्ही
आमच्या शहराला राहू देणार नाही. विकास आणि नामांतर हे वेगवेगळे विषय असून यांचा संबंध
जोडून नामांतराला विरोध करणे वेडेपणा ठरेल. असा दानवे यांनी सांजवार्ता ऑनलाईनच्या
माध्यमातून इशारा दिला आहे.












