मुंबई- राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बांधायचे की नाही, किंवा ते कुठे बांधायचे हे निश्चित होणार आहे. मग उद्धव ठाकरेंचा अयोध्येत जाऊन फायदा काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. जर भाजप-सेनेची युती झाली नाही तर उत्तर प्रदेशात शिवसेनेची मते वाढतील व भाजपची कमी होतील, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले, राज्यातील शिवसेना व भाजप सरकारचे अपयश झाकण्यासाठी त्यांना राम मंदिराचा मुद्दा सुचतोय. उद्धव ठाकरे हे भाजपच्या आधी पहिल्यांदा अयोध्येत जाऊन बोलले. याचा एकच फायदा होईल तो म्हणजे जर युती झाली नाही तर उत्तर प्रदेशात शिवसेनेची मतं वाढतील व भाजपला फटका बसेल. उद्धव ठाकरेंच्या दौर्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे ढोंग आहे. मुख्यमंत्री अशा प्रसंगी वेळ मारुन नेण्यात तरबेज आहेत. जर उद्धव यांना राम तुरुंगात आहे, असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रभू राम त्यांना आशीर्वाद कसे देतील? उद्धव यांच्या अयोध्या दौर्याचा राज्यातील व देशातील सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. उलट उद्धव ठाकरेंना दौरा करायचाच होता तर त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडून मग दौरा करायला हवा होता, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
















