२२ लाखांचा जेसीबी जप्त; चालकाला रंगेहाथ पकडले
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात शासनाने जप्त करून ठेवलेल्या वाळू साठ्यावरच चोरटी वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि. ६) रात्री धाड टाकून अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या चालकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा जेसीबी जप्त करण्यात आला.
पोलीस गोपनीय शाखेचे मनोज नवले यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल झोरे, मनोज नवले आणि संदीप घुसिंगे हे अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना जामगाव सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे शासनाच्या जप्त वाळू साठ्यातून जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी सागर योगीनाथ मिसाळ (वय ३०, रा. अंमळनेर, ता. गंगापूर) हा विनाक्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या जेसीबीद्वारे शासनाच्या मालकीच्या जप्त वाळू साठ्यातून वाळूचा उपसा करताना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच संबंधित जेसीबीचा मालक व चालक स्वतःच असल्याची कबुलीही त्याने दिली.
यानंतर पंचांसमक्ष २२ लाख रुपये किमतीचा जेसीबी जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल झोरे हे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. शासनाने जप्त केलेल्या वाळू साठ्यावरच चोरीचा प्रयत्न झाल्याने वाळू माफियांची वाढती निर्भयता पुन्हा एकदा गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक व साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शासनाच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. अवैध धंद्यांविरोधातील आमची मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहील. या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
- सलीम चाऊस पोलीस निरीक्षक, गंगापूर