बागडेंनी बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा खैरेंचा आरोप

Foto


औरंगाबाद- भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवीन राहीलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीरपणे भाजपचा वेळोवेळी विरोध केलेलाच आहे. ज्यापद्धतीने हा विरोध राज्य पातळीवर आहे त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर भाजप शिवसेनेचा वाद काही लपलेला नाही. याचीच प्रचिती मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांचा राजाबाजार वार्डात व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आली  खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.  

यावेळी बोलताना खैरे म्हणाले की शिवसेना पक्ष वाढत असल्याने ते काहींच्या डोळ्यात सलत होते. म्हणून मुद्दामहून नारेगावमध्ये कचरा टाकण्यास विरोध केला यासाठी त्यांनी भंगारवाल्यांना भरमसाट पैसा देऊन शेतकरी म्हणून उभे केले. भंगारवाल्यानाही ती जागा हडप करायची होती म्हणून ते कचरा टाकण्यास विरोध करत होते. त्याच्या आजूबाजूचे प्लॉट विकून हरिभाऊ बागडेंना पैसा कमवायचा होता. पण आपण त्याठिकाणी आता कचऱ्यासाठी नवीन योजना उभी करणार आहोत.

पुढे बोलताना खैरे म्हणाले सध्या हरिभाऊ बागडे यांच्याच ताब्यात बाजार समिती आहेत. पण व्यापाऱ्यांच्या मुंड्या मोडण्याचे काम बागडे यांनी सर्रासपणे चालवले आहेत. मी पालकमंत्री असताना व्यापाऱ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत केल्या होत्या. कुठलाही पैसा मी कमविला नाही उलट मीच लागेल तिथे पैसा खर्च केला. पण यांनी बाजार समितीतील जमिनी विकून हरिभाऊ बागडेंनी पैसे खाल्ले हे मी स्पष्टपणे सांगतो असा घणाघाती आरोप खासदार खैरे यांनी केला