डॉ.आकांक्षा देशमुख खुन प्रकरण. उत्तर प्रदेशातील मजुराला अटक

Foto

औरंगाबाद- शहरातील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेच्या वसतिगृहात आकांक्षा देशमुख या विद्यार्थिनीच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. पोलिसांनी सात दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला असून, या प्रकरणात एका मजुराला अटक केली आहे. आरोपीने आकांक्षा हिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने विरोध केल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला व तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून तो पसार झाला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

 

आकांक्षा देशमुख हिच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल शर्मा असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील दुद्धी सोनभद्रा येथील रहिवासी आहे. राहुल हा चोरीच्या उद्देशाने आकांक्षा राहत असलेल्या वसतिगृहातील खोलीत आला होता आणि त्यानेच आकांक्षाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. 

 

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मूळची रहिवासी असलेली आकांक्षा देशमुख ही २२ वर्षीय विद्यार्थिनी एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होती. महाविद्यालय परिसरातीलच गंगा वसतिगृहातील २१३ क्रमांकाच्या खोलीत ती राहात होती. आकांक्षा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील हे माजलगावच्या एका साखर कारखान्यावर नोकरीस होते. अलीकडे ते निवृत्त झाले असून, तिची आई  शिक्षिका आहे. तिचे काका हे औरंगाबाद येथील महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून काम करतात, तर तिचा चुलत भाऊ एमजीएममध्येच डॉक्टर आहे.

 

गंगा वसतिगृहात १० डिसेंबरच्या रात्री आकांक्षाचा मृतदेह तिच्या खोलीत सापडला होता. वसतिगृहातील व संस्थेतील काही कर्मचार्‍यांनी पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वीच आकांक्षाला रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या खुनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तपासासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके स्थापण्यात आली होती. एमजीएमच्या ज्या वसतिगृहात आकांक्षा राहत होती.

 

त्या हॉस्टेलजवळच आणखी एका वसतिगृहाचे बांधकाम सुरु आहे. पोलिसांनी या प्रकऱणाच्या तपासाला सुरूवात केल्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत काम करणारा राहुल शर्मा हा मजूर बेपत्ता असल्याचं समजले. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात त्याच्या मूळ गावी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून काल रात्री दोनच्या सुमारास वसतिगृहात आणले. आकांक्षाची हत्या कशाप्रकारे केली याची कबुली राहुलने पोलिसांना दिली. घटनेच्या आधी सात दिवसांपासून शर्मा आकांक्षाच्या रुम समोरच काम करत असे. यामुळे त्याला तिच्याबद्दल माहिती होती. चोरी आणि बलात्काराच्या उद्देशाने त्याने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. एमजीएम हॉस्टेलजवळच आणखी एका वसतिगृहाचं बांधकाम सुरु आहे. तिथेच आरोपी राहुल शर्मा अनेक दिवसांपासून काम करत होता. तो १० डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजताच वसतिगृहाच्या छतावर जाऊन लपला होता. ऱात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आकांशाच्या खोलीत चोरीच्या उद्देशाने शिरला. यावेळी त्याची आकांक्षासोबत झटापट झाली. तिची सोनसोखळी चोरत त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला होता; पण तिचा विरोध वाढल्याने त्याने तिचा तोंड व गळा दाबून खून केला. नंतर रात्री वाजता वसतिगृहातून निघून सीसीटीव्हीपासून लपत आडमार्गाने परिसराबाहेर पडला. तिथून तो सकाळी पाच वाजता रेल्वेने उत्तर प्रदेशात पळाला.

 

गुन्हे शाखेने बोलावले, सिडको पोलिसांनी पकडले

 

आकांक्षाच्या हत्येचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने पाहणी केली असता मजूरच प्रमुख संशयित मारेकरी असल्याचा अंदाज बांधत त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या एक पथका कडून आरोपीच्या वडिलाची चौकशी करीत शर्माला औरंगाबादेत येण्यास सांगितले. सर्व काही प्लॅनिंगने सुरू होते. आरोपीही रेल्वेने औरंगाबादच्या दिशेने येत होता. मात्र, हीच गोष्ट सिडको पोलिसांनादेखील माहिती झाल्याने एका पथकाने उत्तर प्रदेश कडे रवाना होता आरोपीस अटक केली, अशी माहिती सूत्रांनुसार मिळाली.