धक्कादायक: एमजीएमच्या वसतिगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून

Foto

औरंगाबाद- फिजिओथेरपीचे शिक्षण घेणारी डॉ.आकांक्षा अनिल देशमुख (२१) हिचा महात्मा गांधी मिशनच्या(एमजीएम) हॉस्टेलमध्ये घुसून गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्रकार आज(बुधवार) सकाळी समोर आला आहे.


डॉ.आकांक्षा अनिल देशमुख एमजीएम मध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेत होती. आकांक्षा मुळची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील राहिवासी होती. डॉ. आकांक्षा देशमुख मंगळवारी दिवसभर कोणालाही दिसली नाही म्हणून हॉस्टेलच्या वॉर्डनने एका विद्यार्थिनीला सोबत घेऊन तिच्या रुमची तपासणी करण्यासाठी गेल्या असता आकांक्षा निपचित पडलेली दिसली. याची माहिती मिळताच हॉस्टेलच्या वॉर्डनने आकांक्षाचा चुलत भाऊ एमजीएम महाविद्यालयातील प्रा.डॉ.राहुल देशमुख यांना बोलावून घेत आकांक्षाला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती एमजीएम नर्सिंगच्या प्राचार्य आणि वसतिगृहाच्या प्रमुख प्रेरणा दळवी आणि सिडको पोलिस स्टेशनला देण्यात आली.

 

पोस्टमॉर्टममध्ये समोर आले सत्य


आकांक्षाच्या मृत्यूबद्दल साशंकता निर्माण झाल्याने तिचे पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय माजलगाव येथून आलेल्या तिच्या आई वडिलांनी घेतला. घाटी हॉस्पिटलने दिलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आकांक्षाचा गळा दाबून खून केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास केला जाणार असल्याचे परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी करत आहेत.