जि. प. पांगरी शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे प्रकल्पातून जलसंवर्धनाचे महत्त्व

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) जि. प. प्रा. पांगरी शाळेत जलधारा प्रकल्पांतर्गत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर व स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांच्या सहकार्यातून जलसंवर्धन संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी प्रत्यक्ष प्रकल्पद्वारे सादरीकरण करण्यात आले.

जलसंवर्धन म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन, जतन, पुनर्वापर आणि शाश्वत व्यवस्थापन करणे होय. यात पावसाचे पाणी अडवणे, पाण्याची अपव्यय कमी करणे, भूजल पातळी वाढवणे आणि कार्यक्षम वापर यांद्वारे जलसुरक्षा सुनिश्चित केली जाते. पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. शाश्वत विकासासाठी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी जलसंवर्धन आवश्यक आहे. 

या सर्व बार्बीचा विचार करून विद्याथ्यांमध्ये जलसंवर्धनाची माहिती होऊन त्याचा प्रत्यक्ष कशाप्रकारे वापर करता येईल आणि इतरांना कसे सांगता येईल यासाठी जलसंवर्धन प्रकल्पासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तेवढ्याच कल्पकतेने आपल्या सुर्जनशीलतेचा वापर करून अतिशय सुंदर असे प्रकल्प तयार केले. यामध्ये डोंगरावरील चर, सिमेंट बंधारा, मातीचा बंधारा, शेततळे, शेततळ्यातील मत्स्यपालन, रेन हार्वेस्टिंग, ठिबक सिंचन, वृक्ष संवर्धन, सांडपाण्यापासून परसबाग, सौर ऊर्जा निर्मिती आणि त्याचा शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी उपयोग यासारख्या विविध विषयावर विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा प्रतिकृती तयार केल्या होत्या. 

ज्या द्वारे साठलेल्या पाण्याचा जमिनीमध्ये निचरा होऊन त्याचबरोबर ते पाणी जमिनीमध्ये मुरले जाऊन त्यामुळे जमिनीतील भूजल साठा वाढण्यास निश्चितच मदत होणार. भूजल साठा वाढल्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांचे गट तयार करून गटाच्या सहकार्यातून प्रकल्प तयार करण्यात आला. गटाने प्रकल्प तयार केल्यामुळे त्यांना जलसंवर्धन चे दृढीकरण तर झालेच पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संघ भावना निर्माण होण्यास मदत झाली.

 उपस्थित पालकांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया देऊन या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे निरीक्षण आणि परीक्षण करून त्यांचे नंबर काढून त्यांना ट्रॉफी दप्तर आणि पाण्याच्या बॉटल देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक यशवंत दांडगे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत गवारे, प्रकल्प इंजिनियर देवाशीष बावणे, समाधान दौड, राहुल तायडे, शिक्षण प्रेमी शालिकराम तायडे, उदयराज सोन्ने, विनोद जाधव, संतोष बांबर्डे, अमोल बनसोडे, सीमा कोतकर, जनाबाई मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक अनिल पोघे यांनी बघितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अनिल पोघे, भगवान गोरे, सिद्धार्थ तपासे, आनंद खरात व विशाखा इनकर यांनी मेहनत घेतली.