एमआयएमची मुस्लिम बहुल वॉर्डात खूप मोठी ताकद आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहूल वॉर्डात एमआयएमला झालेले मतदान एकतर्फी झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील 25 वॉर्डात एमआयएमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची ताकद नाकारून मनपा निवडणुकीत कुणालाच अंदाज लावता येणे शक्य होणार नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असोदोद्दीन ओवेसी एकत्र आल्यामुळे एमआयएमला शहरातून पहिला आमदार मिळाला. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही एमआयएमने एकट्याच्या बळावर खासदार निवडून आणला. अर्थात त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे हिंदू मतदान मोठ्या प्रमाणावर स्वतःकडे खेचण्यात यश मिळवले होते. हे जरी खरे असले तरी मुस्लिम मतदान एमआयएमला एक गठ्ठा पडले यात काही दुमत असण्याचे कारण राजकीय निरीक्षकांना वाटत नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने अतिआत्मविश्वास दाखविला खरा, परंतु तीन पैकी एकाही जागी त्यांना यश मिळू शकले नाही. त्यामुळे वंचित आणि एमआयएमने दुराभिमान सोडून मनपा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे.
शहरातील 115 पैकी 24 वॉर्ड अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहेत. तर मुस्लिम बहूल वॉर्डात एमआयएमचे प्राबल्य आहे. याकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष वेधले असून ही आघाडी शहरात चमत्कार घडू शकेल, असे निरीक्षण नोंदवले आहे.
सन्मानजनक आघाडी असावा
वंचित बहुजन आघाडीने मनपा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील 55 ते 60 जागा आम्ही लढवू शकतो. एमआयएमबरोबर सन्मानजनक आघाडी झाली तर शहराच्या विकासाच्या दृष्टीने फार मोठी उपलब्ध असेल. आमची आघाडी निश्चित सत्ता मिळवेल यात शंका नाही.
8अमित भुईगळ
जिल्हाध्यक्ष , वंचित आघाडी
सत्ता आमचीच
विधानसभा निवडणुकीत झाले गेले ते विसरून वंचित आघाडीबरोबर आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आमचे वरिष्ठ चर्चा करतीलच. परंतु आम्ही स्थानिक मंडळींनी एकत्र लढण्याचा मनापासून निर्णय घेतला आहे. या शहराला चांगले दिवस दाखविण्याची आमची तळमळ आहे. आम्ही वंचित आघाडीबरोबर सत्तेवर येऊ.
डॉ. गफ्फार कादरी
कार्यालध्यक्ष, एमआयएम