सिल्लोड (प्रतिनिधी) : सिल्लोड सोयगाव तालुक्यात ढगसदृश्य पाऊस व सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे १०० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट शासकीय मदत मिळावी या संदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच कृषी मंत्री यांची दत्तात्रय भरणे यांची भेट घेवून त्यासंदर्भात निवेदन दिले.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. खरीप हंगामात सुरुवातीला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेला सातत्याचा व ढगफुटी सदृश्य पावसाने
शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या. सर्वच मंडळात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेलो असता नुकसानग्रस्तांनी टाहो फोडत शासकीय मदतीची याचना केली.
अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असल्याने त्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी असे आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून राज्य शासन बधितांना वाऱ्यावर सोडणार नाही असे स्पष्ट करीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना शासन मदत देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
सर्व नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना विमाचा लाभ घ्यावा : अतिवृष्टीमुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्व नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना विमाचा लाभ घ्यावा असे आमदार अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.
४० टक्क्यांहून कमी आणेवारी आलेली असल्याने विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये या गंभीर परिस्थितीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना कुठलेही कपात न करता पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्याना दिल्या.