शिवरायांच्या वेशभूषेत सभापतींनाच घातला मुजरा, राष्ट्रवादीच्या आमदाराची स्टंटबाजी

Foto


मुंबई- राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आले होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच आमदार महोदयांना आपण शिवरायांच्या वेशात आहोत, याचे भान राहिले नाही. त्यांनी त्याच वेशामध्ये रामराजे नाईक-निंबाळकरांना मुजरा केला. रामराजे नाईक-निंबाळकरही त्यांना अभिवादन करत पुढे निघून गेले.

एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. मात्र लक्ष वेधून घेत असताना शिवरायांच्या वेशभूषेत असूनही सभापतींनाच मुजरा घातल्यामुळे गजभिये यांच्या हातून प्रचंड मोठी चूक घडली आहे अशी चर्चा होत आहे.

प्रकाश गजभिये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून विधिमंडळाच्या आवारात प्रवेश केला. त्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजभिये यांनी राज्य सरकारला अनेक प्रश्नही विचारले. यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भिडेंच्या वेशभूषेत आंदोलन केलं होतं. इतकेच नाही तर मोठा आंबा घेऊन ते विधानभवनात आले होते. या आंब्यांवर 'संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे', असेही लिहिलेले होते.तसेच संतांच्या वेशभूषेत भजन-कीर्तनाच्या माध्यमातूनही प्रकाश गजभिये यांनी आंदोलन केले होते. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील वेशभूष चर्चेचा विषय ठरली होती.